नक्की वाचा #लढवय्या_नेतृत्त्वाचा_महाराष्ट्र
पवार साहेब कधी काय करतील याचा नेम नसतो. पवार साहेब नेहमी अविश्वसनीय राहिले. पण यावेळी पवारांची ‘अविश्वसनीय’ ही भूमिका पाउस साकारतोय. आणि पवार साहेब..?
या विधानसभेतल्या प्रचारातला हा सर्वात प्रेरणादायी फोटो आहे. तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात हा मुद्दा वेगळा. ही जिद्द आणायची कुठून?
प्रत्येक लढणाऱ्या माणसासाठी हा फोटो महत्वाचा आहे. सगळ्यात आवडलेली गोष्ट ही आहे की पवार साहेब आजाराचं कारण सांगत नाहीत. सहानुभूती मागत नाहीत. राजकीय विद्वानांना पवार साहेब संपले, पक्ष संपला असं वाटत होतं. पण महाराष्ट्राच्या राजकारणाची ही खासियत आहे. महाराष्ट्रात ईडी आणि सीडीने माणसं संपवता येत नाहीत. इथे प्रत्येक निवडणूक पहिली निवडणूक असल्या सारखीच जोर लावून लढावी लागते. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण थोडे नडले होते. हे स्वपक्षातले. पण देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तुल्यबळ प्रतीस्पर्धी पवारांना पहिल्यांदाच मिळालाय. देवेंद्र फडणवीस पण तेल लावलेले पैलवान आहेत हे मान्य करावे लागेल. देवेंद्र फडणवीस हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. अर्थात दिल्लीतून भाजपच्या नेतृत्वाला पहिल्यांदाच एवढ भक्कम पाठबळ आहे. दिल्लीहून एवढी ताकद प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांना असती तर...? असो.
मी पक्षपाती आहे.
पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे राजकारणातले आवडीचे विषय होते. पण रामदास आठवले खूप मोठी चळवळ उभी करतील हा बालपणीचा बालीशपणाही होता. कांशीराम देशाच्या राजकारणाची दिशा बदलतील हा कॉलेजमधला विचार. महाजन आणि पर्रीकर हे भावी पंतप्रधान असतील असं वाटलं होतं. हे आपल्यातल्या बहुतेकांना वाटलं होतं. मराठी मुद्यावर आपण उगाच गंडलो होतो तो काळ. यातलं काहीच खरं ठरलं नाही. मग राजकारणातलं काही कळत नाही हे लक्षात आलं. आता विजयी कुणीही होवो. लढाई तुल्यबळ झाली पाहिजे. लोकशाहीचं यश तेच आहे.
साने गुरुजींच्या पुस्तकात वाचलं. सरदार वल्लभभाई पटेल एकदां म्हणाले होते, 'गुजराथला जुना भव्य दिव्य इतिहास नसेल तर गुजराथनें नवीन दिव्य इतिहास बनविला पाहिजे !'
मला आनंद आहे. माझ्या महाराष्ट्राला इतिहासही आहे. वर्तमानही आहे. आणि भविष्यही आहे. फक्त भविष्यात माझ्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा या देशाच्या विकासात हातभार लागो ही सदिच्छा. पक्ष कुठलाही असो. आणी निवडणूक अशी जोरदार झाली पाहिजे. मूडदुस झालेल्या कॉंग्रेसने शरद पवार, देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर आणी राज ठाकरे आपल्या पक्षासाठी किती कष्ट घेताहेत याची जरा तरी शिकवण घेतली पाहिजे. तुकडे झाले तरी लढता आलं पाहिजे. तुकड्यावर लढण्यापेक्षा बरं असतं.
0 टिप्पण्या