कारमध्ये माझ्या शेजारी बसली होती
Marathi stories |
ती कारमध्ये माझ्या शेजारी बसली होती...मी कार चालवत होतो...आम्ही दोघेही शांत होतो...कोणीचं काही बोलत नव्हतं... माझ्या मनातील धाकधूक, धडधड प्रचंड वाढलेली होती...तिचा कसानुसा कोमेजलेला चेहरा बघुन माझ्या मनात अक्षरशः वादळ सुरू होतं...पण मी स्वतःला सावरत खंबीर रहायचा प्रयत्न करत होतो...शेवटी आम्ही पोहोचलो...ती पलीकडून उतरली...मागच्या सिटवर ठेवलेलं तिचं सामान मी खाली उतरवलं...गाडी बंद करून मी सामान घेऊन तिच्यापाशी आलो...पुन्हा तिचा चेहरा पाहिला आणि काळजात धस्स झालं...परमेश्वरा का असा प्रसंग माझ्यावर आणलास?? देवाला मी कळवळून म्हणालो...
Indian girls |
" येते मी..." तिच्या त्या गळ्यात अडकलेल्या आवंढायुक्त शब्दांनी माझ्यावर अक्षरशः आकाश कोसळलं...हातापायातले त्राणचं जणू कोणी काढून घेतले होते...छातीचे ठोके टिपेला पोहोचले होते...ती माझ्यापाशी आली...मी तिला कवेत घेतलं...तिच्या कपाळावर माझे ओठ टेकवले...
" बाळा सांभाळून रहा..." माझ्या तोंडून कसेबसे एवढेच तीन शब्द बाहेर पडले...तिनं केवळ मानेने हो म्हंटलं...पाठीवर सॅक आणि हातातील ट्रॉली बॅग ओढत ती होस्टेलच्या पायऱ्या चढू लागली...मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अगतिकपणे पहात होतो...ती मागे वळून पाहिलं का???...दिसेल का पुन्हा तिचा चेहरा???...मी आतुरतेने पाहू लागलो...पण ती नाही वळली...बहुदा तिला तिच्या डोळ्यातले अश्रू मला दाखवायचे नसावेत...पायऱ्या चढून ती तिच्या रुमकडे वळत डोळ्यासमोरून दूर गेली आणि इतक्या वेळ स्वतःला बांधून ठेवतं मनात दाबून ठेवलेला माझा आतला बांध फुटला...कसाबसा पटकन गाडीत बसलो...गाडी वळवली आणि होस्टेलच्या आवारातून गाडी बाहेर काढून रस्त्यावर आलो...डोळ्यात साठलेल्या आसवांनी समोरचं धूसर दिसू लागलं तशी गाडी रस्त्याच्या बाजूला लावली...आणि इतक्या वेळ मनावर ठेवलेला दगड बाजूला झाला आणि आसवांचे धरण फुटलं...
आज पासून पोरगी हॉस्टेलवर राहायला गेली होती आणि म्हाळसाच्या अनुपस्थितीत तिला होस्टेलवर सोडायची कटु जबाबदारी माझ्यावर आली होती...ज्या पोरीला आजपर्यंत कधी क्षणभरही डोळ्यासमोरून बाजूला होऊ दिलं नव्हतं आज तिला एका अनोळखी ठिकाणी सोडताना माझ्यावर वेदनाचा पहाड कोसळला होता...
शेवटी ही एक अपरिहार्यता होती...पाखरांच्या पंखांना बळ द्यायचं असेल तर त्यांना स्वतंत्र उडू द्यायला हवं हे जरी समजत होतं तरी बापाचे मन त्याला तयार होत नव्हतं...
कितीतरी वेळ मी तसाच बसून होतो...भावनांचा वेग ओसरला तसं मनात आलं...' जावं का पुन्हा परत, यावं का तिला पुन्हा घेऊन?...' डोक्यात विचार चमकला, डोळे आनंदाने विस्फारले, गाडी सुरू केली आणि मागे वळवून तिच्या होस्टेलच्या दिशेने निघालो...काही अंतर गेलो असेल पण पुन्हा थबकलो...मनात हळवा बाप आणि व्यावहारिक बाप यांच्यात झुंज सुरू होती...हळव्या मनाच्या बापावर व्यावहारिक बाप कुरघोडी करत होता आणि शेवटी तोच जिंकला...
गाडी पुन्हा घराच्या दिशेने वळवली आणि निघालो...कशीबशी गाडी चालवत घरी आलो...मनातलं काहूर काही थांबत नव्हतं... तिचा विचार डोक्यातून जात नव्हता...हजार प्रश्नांच्या मधमाश्या चिंतेच आग्यामोहोळ मनात तयार करत होत्या...
काय करत असेल ती आता??
सामान लावीलं का व्यवस्थित??
तिनं काही खाल्लं असेल का?
तिच्या आवडीचं जेवण नसेल तर???
ब्रश सापडेल का तिला??...जरा आळशीच आहे.
झोप येईल ना तिला??
थंडी तर वाजणार नाही ना??
पांघरूण घेईल ना??
माझी आठवण आली तर काय करेल??
झोपेत ''पप्पा पाणी..."अशी हाक मारली तर कोण पाणी देईल तिला??..उठून घेईल का तशीच झोपेल???
सकाळी उठेल ना लवकर वेळेत???
अशा असंख्य विचारांनी डोकं भंडावून गेलं होतं...त्या रात्री डोळ्याला डोळा लागला नाही...
ती गेली...तिथे रुळू लागली पण इकडे मात्र माझ्या घराची मरगळ झाली...तिच्या नसण्याने सगळं घर अंगावर येऊ लागलंय...इतके वर्षे छोटं छोटं वाटणारं घर आता अक्षरशः खूप मोठच्या मोठं दिसू लागलंय...एक भयाण मोठी पोकळी निर्माण झाल्यासारखं झालंय...घरात असलेला तिचा चिवचिवाट बंद झाला होता...आणि ती भयाण शांतता वेड लावतेय...आताशा घरात पाऊल टाकावेसेचं वाटतं नाही...दिवसभर तिचा सुरू असलेला गदारोळ आता जणू लपून बसलेला आहे...तिच्या रूममध्ये तर पाऊलही टाकावे वाटतं नाही...ऑफिसवरून घरी आलो आणि सहज तिच्या रुममध्ये डोकावलो...सळसळत्या उत्साहाचा तिथला कल्ला गायब होऊन आता टाचणी पडली तर आवाज येईल अशी शांतता डोकं बधीर करून टाकत होती...नेहमी अस्त्याव्यस्त पसारा असणारी तिची रूम आज अगदीच ओकीबोकी वाटतं होती...तिच्या उशीला जरासं उचलून हातात घेतले... किती हट्ट करायची या उशीसाठी...कोणी हात लावलेलं चालायचं नाही तिला...आणि आज तीच उशी मलूल होऊन पडली होती...उशीवरून हलकेच हात फिरवताना डोळ्यात पुन्हा पाणी तरारलं...
" अहो काय करू जेवायला?"...म्हाळसाचा आवाज आला तसा भानावर आलो...
'तिला जे पाहिजे ते कर' असं नेहमीचं तोंडात येणार वाक्य आवरतं घेत म्हणालो " कर गं, तुला काय करायचं ते कर"...
खरंतर आजकाल खाण्यापिण्यात अजिबात रसचं राहिलेला नाही...म्हाळसाने कितीही काहीही केलं तर त्यात स्वारस्य वाटतं नाही...जेवताना सुरू असलेला किलकीलाट नसताना काहीही खायला मजाचं येत नाही... साधे पोहे वा खिचडी केली तरी वेळ निभावून नेली जाते...आताशा माझा डबा ही रोडावलाय...त्याच्याही अंगात आताशा काही त्राण नसतात...नेहमी सारखी भांडाभांडी करून खायची गंमत काही आता येत नाही...
आता प्रतिक्षा असते ते तिच्या घरी येण्याची... सुट्टी असली की ती कधी येते असं होऊन जातं...आता काल आली होती रक्षाबंधनला...किती दिवसांनी ती मला दिसणार होती...घराच्या ती जवळ आली हे समजलं आणि माझ्या लिफ्टपाशी येरझारा सुरू झाल्या...लिफ्ट खालून वर येईपर्यंतचा तो एक एक क्षण काढणं मला अवघड जात होतं...लिफ्टचा दरवाजा उघडला, ती दिसली आणि मी तिला तिथेच घट्ट मिठी मारली...काय आनंद होता तो...शब्दात नाही सांगू शकत...ती आली आणि घर पुन्हा चमकू लागलं...घरातले एरवी शांत शांत असणारे भांडेकुंडे उत्साहाने ताडताड आवाज करू लागले...आज देवघरातले देवही खूप तेजस्वी दिसत होते...पुन्हा घरात कलकलाट सुरू झाला होता...पुन्हा भांडाभांडी सुरू झाली होती...शब्दांचे भुईनाळे पुन्हा उधळू लागले होते...बडबडीचा उधाण वारा सैरावैरा धावत घरातील सगळी मरगळ घराबाहेर उधळून लावत होता...
पण हे सर्व फक्त दोन दिवस हे मला माहित होतं...कळत होतं पण वळत नव्हतं...
बघता बघता दोन दिवस कापरासारखे उडून गेले... ती पुन्हा होस्टेलवर गेली...आता माझं घर पुन्हा उदास होत चातकासारखी पुन्हा तिची वाट पहात उभं असतो...आताशा हेच कालचक्र सुरू असतं... पूर्वी वेळ मिळायचा नाही, आता एक एक क्षण जाता जातं नाही...
आज तिचा वाढदिवस...आज इतक्या वर्षात असं झालं नाही की ती वाढदिवसाच्या दिवशी घरी नाही...तिचा वाढदिवस म्हणजे एक उत्सव असतो घरात, पण आज खूप ओकबोक वाटतंय...
सकाळी ऑफिसला निघण्याआधी नेहमीप्रमाणे देवाला नमस्कार केला...खुप काही मागितलं तिच्यासाठी पण एक माझ्यासाठीही मागितलं...
'म्हंटल देवा, पुढच्या जन्मी जरा उलट कर, तिला माझा बाप कर आणि मला तिची मुलगी कर...'
एक बाप असणं फार अवघड हे हो...
कुलकर्ण्यांचा " हळवा " प्रशांत
0 टिप्पण्या