मुंबई
शरद पवारांनी बीडमध्ये येऊन तिकिट जाहीर केलेल्या केज विधानसभेच्या
राष्ट्रवादीच्या उमेदवार नमिता मुंदडांना आता भाजपने तिकिट देण्याचे फायनल केले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार थोड्याच वेळात भाजपची यादी देखील जाहीर होणार आहे.
पवारांनी उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडांना भाजपचे तिकिट
नमिता मुंदडा या स्व.विमलताई मुंदडा यांच्या सुन आहेत. स्व.मुंदडा यांनी केज या अनुसुचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून पाच वेळा विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले आहे. राष्ट्रवादीची सुत्रे जेव्हापासून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे आली तेव्हापासून मुंदडांना पक्षांतर्गत वादाला मोठे तोंड द्यावे लागत होते. या संबंधी त्यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र पक्षांतर्गत विरोधकांच्या पडद्याआडूनच्या खेळी थांबायला तयार नव्हत्या. त्यामुळे खुद्द शरद पवारांनी बीडमध्ये येत पक्षांतर्गत वाद मिटविण्याचा प्रयत्न करुन महाराष्ट्रातील पहिली उमेदवारी नमिता मुंदडा यांना जाहीर केली होती. मात्र लागलीच दोन दिवसांनी मुंदडा यांनी सोशल मीडियावरुन कुठल्याही पक्षाच्या नेत्याचा फोटो न लावता प्रचार सुरु केला. त्यामुळे मुंदडा भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत होते. काल दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत उमेदवारांची यादी अंतिम करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर केज मतदारसंघातून मुंदडा यांचे नाव फायनल झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
या ठिकाणी भाजपच्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे प्रतिनिधीत्व करीत आहेत. आता त्यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
0 टिप्पण्या