काल रात्री आपल्या दोघांमध्ये "घरगुती" विषयावरून "मतभेद"
Girls |
काल रात्री आपल्या दोघांमध्ये "घरगुती" विषयावरून "मतभेद" काय झाले, रागाच्या भरात किती सहज बोलून गेलास रे तू... "माझ्या घरातून चालती हो आणि ही सगळी नाटकं तुझ्या तुझ्या घरात करायची...!"
एवढं बोलून तू तोंडावर पांघरून घेऊन झोपी ही गेलास...
पण...
पण हे बोलताना माझ्या मनाचा एकक्षण तरी विचार केलास का रे तू ?
माझ्या घरातून ?
तुझ्या तुझ्या घरी ?
हे कसले रे वाक्य ?
म्हणजे हे घर माझं नव्हतंच का कधी ?
कानात अगणित सुया टोचल्याचा भास आणि मेंदूला येत असलेल्या असंख्य झिणझिण्या घेऊन मी डोक्याला हात लावून ती काळी रात्र एका कोपर्यात बसून रडून काढली...
डोळ्यातले अश्रू अनावर होते. अंगातला कंप, ओठांची थरथर थांबतच नव्हती...
विचारांच्या थैमानात आपल्या लग्नानंतरची ती पहिली रात्र ही माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेली...
तुझ्या स्पर्शाने शरीराला आलेली ती पहिली शिरशिरी.. अनामिक भीतीने झालेली ती ओठांची थरथर.... काय गोड क्षण होते ना ते...?
पण...
पण आजच्या कंपनांमध्ये आणि तेव्हाच्या कंपनांमध्ये जमीन अस्मानाचा फरक होता रे...
हो... जमीन अस्मानाचा फरक...
गोड क्षण कधी कडू झाले समजलंच नाही...
काय चुकलं होतं रे माझं ?
तू चुकला होतास असं ही मी म्हणणार नाही. मान्य आहे मला तुला "सर्व बाजू" सांभाळाव्या लागतात..
आई-वडील, भाऊ-बहीण, बायको ह्या सर्वांमध्ये समतोल साधताना तुझी कसरत होते, मलाही ते दिसतंय....
तू कित्येक वेळा मला म्हणतोस ही 'जरा समजुतीने घे, थोडं ॲडजस्ट कर. केलं ना रे तुझ्यासाठी अडजस्टमेंट. नाही केलं का ?
कित्येकदा मला हे सांगताना तुझी झालेली गळचेपी चेहऱ्यावर स्पष्ट दिसली ही आहे ...
पण...
पण माझी कुचंबना तुला कधी दिसली का रे ?
माझी कुचंबना ? बोल ना... त्याचं काय ?
माझी होणारी कुचंबणा मी तुला नाही सांगणार तर कोणाला सांगू ? सांग ना..?
खदखदणारी गोष्ट तुला सांगितलं की माझं मन कसं पिसासारखं हलकं होईल असं वाटत होतं... एक मोकळेपणाचा अनुभव घेईन अशी वेडी आशा होती रे माझी...
पण माझ्या अपेक्षांची इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली बघ...
कालचे तुझी बोचरे शब्द भाल्यासारखे काळजात घुसले... किंबहुना रुतले...
कसं काय बोलू शकलास रे तू हे जहाल वाक्य ?
फक्त तुम्हा सर्वांसाठी... खास करून तुझ्यासाठी... मी माझं घर सोडलं...
माझं राहतं घर सोडले रे...
जिथे मी लहानाची मोठी झाले, खेळले, बागडले... माझी खेळणी, माझ्या मैत्रिणी, माझे आई वडील, माझा भाऊ, माझी बहीण... सर्व मागे सोडून आले मी....
कायमची.... फक्त तुझ्यासाठी...
राहून बघ कायमचं बाहेर... हो कायमचं...
मी आले तुझ्याकडे तसं...अगदी तसं...
ते ही एकटं... सर्व सोयींनी युक्त एका सोन्याच्या पिंजऱ्यात... पावलोपावली अपमान करून घेत... कोणत्याही मोबदलयाची अपेक्षा न ठेवता... राहू शकशील ? जमेल ?
सोपं नसतं रे ते...
माझ्यासाठी तर नक्कीच नव्हतं... तरीही मी आले सर्व सोडून.. फक्त आणि फक्त तुझ्यासाठी...!!
पण...
हे सर्व सोडताना आणि एक महत्त्वाची गोष्टही मी सोडून आले जी तूझ्या नजरेला कधी आलीच नाही रे...
माहितीए कोणती ?
माझा स्वाभिमान...!!!
ठेवलायं मी ते काढून कायमचा... तुझ्या घराबाहेर...
कधीतरी जाऊन शोध घे त्याचा.. बघ सापडतोय का तो तुला ? आणि हो... जरा बघ किती 'मळून फाटलाय' तो...
किती घाण झालाय.. अपमान, थट्टा, चेष्टा, टर या सारख्या असंख्य शिंतोडयांनी...
बघशील ना रे एकदा... माझ्यासाठी... ??
आणि हो, जमलंच तर आणि एक कर...
मला ह्या घरात बायको म्हणून स्थान दे...
आश्रित म्हणून नको...
कारण मी आश्रित नाही...
कारण मी आश्रित नाही...
0 टिप्पण्या