"तुम्ही मला एकादे विषारी औषध द्या. मी जाऊन त्या म्हातारीला पाजून देते. नाहीतर मी आता सासरी जाणारच नाही."

 


#एक_चिमुटभर_विष_दररोज- 


Marathi story


लेखक-अनामिक.

       आरती चे लग्न झाले आणि ती आपला नवरा व सासू च्या सोबत सासरी नांदायला आली. 
       काही दिवसांतच आरतीला जानवू लागले की तिचे सासू सोबत काही पटणार नाही. सासू जुन्या विचारांची होती आणि सून आधुनिक विचारांची. आरती आणि तिच्या सासूचे दररोज भांडण होऊ लागले.
  
      असेच दिवस जात राहिले, महीने गेले व वर्ष ही सरले. सासूने चुका काढणं, टोचून बोलणं सोडलं नाही आणि आरतीने प्रत्येक शब्दाला प्रत्युत्तर करणे सोडलं नाही. घरातील परिस्थीती, तनावाचे वातावरण अजून तनावग्रस्त होऊ लागले. 
      आरती आता आपल्या सासूचा द्वेष करु लागली व तिच्या मनातून ती एकदम उतरली. आरती ला तेव्हा खूपच वाईट वाटायचे जेव्हा आपल्या भारतीय परम्परेनुसार दूसऱ्यांच्या समोर आपल्या सासूला मान द्यावा लागायचा, मनात नसताना पाया पडावे लागायचे.

        आता काहीही करून आरती आपल्या सासूच्या कचाट्यातून सुटण्याविषयी विचार करू लागली.
      एके दिवशी जेव्हा आरती चे अपल्या सासूशी कडाक्याचे भांडण झाले आणि नवराही आईची बाजू घेऊन बोलू लागला, तेव्हा ती नाराज होऊन माहेरी निघून गेली.

        आरती चे वडिल आयुर्वेदीक डॉक्टर होते. तिने रडत रडत आपली व्यथा वडिलांना सांगितली व म्हणाली, "तुम्ही मला एकादे विषारी औषध द्या. मी जाऊन त्या म्हातारीला पाजून देते. नाहीतर मी आता सासरी जाणारच नाही." 

     मुलीचे दुःख बघून वडिलांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले , “बाळा, जर तु तुझ्या सासूला विषारी औषध पाजून मारशील तर तुला पोलिस पकडून नेतील आणि सोबत मलाही, कारण ते औषध मी तुला दिलेले असेल, म्हणून असे करणे ठिक होणार नाही.”

     परंतु आरती हट्टाला पेटली की , “मला ते औषध तुम्हाला द्यावेच लागेल. आता काहीही झाले तरी मला तिचं तोंड पहायचं नाही."
       वडिलांनी काही विचार केला व म्हणाले– “ठीक आहे. तुझ्या मनासारखं होऊ दे. परंतु मी तुला कैद झालेलीही पाहू शकत नाही. म्हणून मी जसे सांगतो तसे तुला करावे लागेल. तुला हे चालेल तर हो म्हण."      
   
आरती ने विचारले, "काय करावे लागेल
       वडिलांनी एका पुडीत विषारी औषधाची पावडर बांधून आरती च्या हातात देत म्हणाले, “तू फक्त या पुडीतील फक्त एक चिमूट भर औषध दररोज तुझ्या सासूच्या जेवणात मिसळून द्यायचे आहे. औषधाचे कमी प्रमाण असल्याने त्या एकदम मरणार नाहीत परंतु हळूहळू आतून अशक्त होत जाऊन पाच- सहा महिन्यांत मरून जातील. लोकांना वाटेल त्या नैसर्गिक रित्या आपोआप वारल्या.”
        वडिलांनी सांगितले, “परंतू तुला खूपच सावध रहावे लागेल म्हणजे तुझ्या नवऱ्याला अजिबात संशय यायला नको, नाहीतर आपणा दोघांना पोलीस अटक करतील. यासाठी आजपासून तू सासूशी अजिबात भांडणार नाहीस, उलट त्यांची सेवा करशील 
       जर त्या तुला घालून पाडून बोलल्या तरी तु गुपचूप ऐकून घेशील. अजिबात प्रत्युत्तर करणार नाहीस. सांग, करू शकशील हे सर्व?
       आरती ने विचार केला की सहा एक महिन्यांची तर गोष्ट आहे. नंतर तर सुटका होऊनच जाईल. म्हणून तिने सर्व मान्य केले

 

     वडिलांनी दिलेली औषधाची पुडी घेऊन आरती सासरी आली. दुसऱ्याच दिवसापासून तिने सासूच्या जेवणात एक चिमूटभर औषध टाकणे सुरु केले. सासू सोबत आपले वागणे ही तिने बदलून टाकले. आता ती सासूच्या कशाही टोमण्यांना उलटून उत्तर देत नव्हती. उलट राग गिळून हसत ऐकून घेत असे. रोज सासू चे पाय चेपून देई आणि तिच्या प्रत्येक गरजांकडे लक्ष देऊ लागली. 
   सासू ला विचारुन तिच्या आवडीचे जेवण बनवू लागली. तिच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करु लागली. 
     असेच काही आठवडे गेले. सासूच्या स्वभावात ही बदल घडू लागला. आपल्या टोमण्यांना सुनेकडून उलट उत्तर न मिळाल्याने तिचे टोमणेही कमी होत गेले व कधी कधी सूनेच्या सेवेने प्रसन्न होऊन आशिर्वाद ही देवू लागली.  
      हळूहळू चार महिने उलटून गेले. आरती नियमित सासू ला जेवणातून एक चिमूट विषारी औषध देत आली होती. परन्तु त्या घरातील वातावरण अगदीच बदलून गेले होते. 

         सासू-सूनेचे भांडण ही जुनी गोष्ट झाली होती. आधी जी सासू आरती ला शिव्यांची लाखोली वाहण्यात थकत नव्हती, आता तीच शेजारीपाजाऱ्यांजवळ आरतीची स्तुती गात होती. सुनेला जवळ बसवून खायला घालत होती आणि झोपण्याआधी सुनेशी प्रेमाने गप्पा मारल्या शिवाय झोप येत नव्हती. 
       सहावा महिना येता येता आरती ला वाटू लागले की तिची सासू तिला अगदी मुलीसारखी 
मानू लागली आहे. तिला ही सासू मध्ये आपली आईची माया दिसू लागली होती. 
      ती जेव्हा विचार करत होती की तिने दिलेल्या विषामुळे थोड्याच दिवसात तिची सासू मरण पावेल, ती बेचैन होऊ लागली. 
       अशाच मनःस्थितीत एके दिवशी ती पुन्हा आपल्या माहेरी आली व वडिलांना म्हणाली, "बाबा, मला त्या विषाचा प्रभाव नष्ट करणारे औषध द्या, कारण मला माझ्या आई सारख्या सासूंना मारू नाही वाटत. त्या खूप चांगल्या आहेत आणि मी आता त्यांच्यावर आईसारखेच प्रेम करू लागले आहे."
      वडिल जोरजोरात हसायला लागले व म्हणाले, " विष? कोणते विष? मी तर तुला विषारी औषधांच्या नावाखाली 'पाचक चुर्ण' दिले होते......"

मुलींना चांगले मार्गदर्शन करा, आई वडिलांचे खरे कर्तव्य पाळा.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या