एका लग्नाची गोष्ट | marathi love story | प्रेम

एका लग्नाची गोष्ट :


लग्नाची पहिली २-३ वर्षे मात्र छान गुलाबी, मऊ, तरल आणि स्वप्नाळू असतात.....

हातात हात घालून गप्पा मारायचे असतात, नवनवीन स्वप्न रंगवायची असतात.

पण हे दिवसही पटकन उडून जातात आणि कदाचीत याच काळात बैंकेतील शुन्य थोडेसे कमी होतात.....

कारण थोड़ी हौस-मौज केली जाते, थोड हिंडणे - फिरणे होतं, खरेदीही होते...

मग हळूच चाहुल लागते बाळाची आणि वर्ष भरातच पाळणा हलू लागतो.....

सर्व लक्ष आता बाळावर केंद्रीत होते. त्याचे खाणे-पिणे, शी-शू, उठ - बस इत्यादी...

त्याची खेळणी, त्याचे कपड़े, त्याचे लाड कौतुक. वेळ कसा फटाफट निघून जातो....

एव्हाना तिचा हात नकळत त्याच्या हातून सूटलेला असतो, गप्पा मारणे, हिंडणे - फिरणे केव्हाचं बंद झालेले असते पण दोघांच्याही हे लक्षात येत नाही....

अशातच तिशीचा उंबरठा ओलांडलेला जातो.....

बाळ मोठं होत जातं.....

ती बाळात गुरफटत जाते आणि तो आपल्या कामात. घराचा हप्ता, गाडीचा हप्ता आणि त्यात बाळाची जबाबदारी. त्याच्या शिक्षणाची, भविष्याची सोय आणि त्याच बरोबर बैंकेत शून्य वाढवायचे टेंशन....

तो पूर्णपणे स्व:तला कामात झोकुन देतो.

बाळाचे शाळेत ADMISSION होते, तो मोठा होवू लागतो. तिचा सगळा वेळ बाळाचे उठ-बस करता करता संपतो.

एव्हाना पस्तीशी आलेली असते, स्वतःचं घर असतं.

बैंकेत बऱ्यापैकी शून्य जमा झालेले असतात पण तरीही काही तरी कमी असते आणि पण ते काय ते समजत नसते.....

त्यामुळे तिची चिडचिड वाढलेली असते आणि त्याचा ही वैताग वाढत जातो आणि तो मग दर वीकेंड ला 'एकच प्याला' सुरु करतो.....

दिवसामागुन दिवस जात असतात....

मूलं मोठी होतं असतात....

त्यांच स्वत:च एक विश्व तयार होत असतं.....

त्याचीही दहावी येते आणि दहावी पर्यंत दोघांनीही चाळीशी ओलांडलेली असते....

बैंकेत शुन्यांची भर पडतच असते.....

एका निवांत क्षणी  त्याला मग ते जुने दिवस आठवतात.....

वेळ साधुन "तो" तिला म्हणतो अगं ! ये जरा अशी समोर बस जवळ.  पुन्हा एकदा हातात हात घालून गप्पा मारू, कुठे तरी फिरायला जावू.....

ती ज़रा विचित्र नजरेनेच त्याच्याकडे बघून म्हणते 'कुठल्या वयात काहीही सुचतं तुम्हाला'. इथे ढीगभर काम पडलीयेत मला आणि तुम्हाला गप्पा सुचतायत' कमरेला पदर खोचुन ती निघून जाते.....

मग येते पंचेचाळीशी. डोळ्यावर चश्मा चढलेला असतो. एक दोन सुरुकुत्या डोकावत असतात. केस आपला काळा कलर केव्हाच सोडू लागलेले असतात.....

मूलं आता COLLEGE मध्ये असतात.....

तिने स्वतःचे नांव भजनी मंडळामध्ये घातलेलं असतं आणि याचे वीकेंडचे 'एकच प्याला'चे कार्यक्रम सुरुच असतात......

मूलं COLLEGE मधून बाहेर पडतात...

आपल्या पायावर उभी राहतात. आता त्यांना पंख फुटलेले असतात आणि एक दिवस ती दूर परदेशी उडून जातात.....

आता त्याच्या केसांनी काळ्या रंगाची आणि काही ठिकाणी डोक्याची साथ सोडलेली असते.....

तिलाही चष्मा लागलेला असतो.....

आता "तो" तिला म्हातारी म्हणू लागतो, कारण स्वतःही म्हातारा झालेला असतो.....

पंच्च्चावन सोडून 'साठी' कड़े वाटचाल सुरु होते.....

 बैंकेत आता किती शून्य आहेत हे ही त्याला माहीत नसतं.....

एकच प्यालाचे कार्यक्रम एव्हाना आपोआप बंद होत आलेले असतात.....

औषध- गोळ्या यांच्या वेळ-वार ठरलेले असतात.....

डॉक्टरांच्या तारखाही ठरलेल्या असतात.....

मूलं मोठी झाल्यावर लागेल म्हणून घेतलेलं चार-पाच खोल्यांच घर अंगावर येत असतं.....

आता मूलं कधीतरी परत येतील ही वाट बघणं तेवढच काय ते हातात असतं.....

आणि तो एक दिवस येतो.....

संध्याकाळची वेळ असते म्हातारा झोपळयावर मंद झोके घेत बसलेला असतो...

म्हातारी तिन्ही सांजेचा दिवा लावत असते...

म्हातारा लांबून हे बघत असतो आणि तेवढ्यात फोन वाजतो...

तो लगबगीने जावून फोन घेतो. समोरुन मुलगा बोलत असतो.....

मुलगा आपल्या लग्नाची बातमी देतो आणि परदेशीच राहणार असेही सांगतो.....

म्हातारा थोड़ा गड़बड़तो. काय बोलावे हे त्याला सुचतच नाही. म्हातारा मुलाला बैंकेतल्या शुन्यांविषयी (बँक बॅलन्स) काय करायच ते विचारतो.....

आता परदेशातल्या शुन्याच्या मानाने म्हाताऱ्याचे शून्य म्हणजे मुलाच्या दृष्टीने चिल्लरच असते.....

तो म्हाताऱ्याला एक सल्ला देतो, 'एक काम करा त्याचा एक ट्रस्ट करा आणि वृद्धाश्रमाला द्या आणि तुम्हीही तिथेच रहा'.

पुढचं थोडसं जुजबी बोलून मुलगा फोन ठेवून देतो....

म्हातारा पुन्हा झोपळयावर येवून बसतो,
म्हातारीची दिवाबत्ती होत आलेली असते ...


"तो" तिला हाक मारतो 'अग ये आज पुन्हा हातात हात घालून गप्पा मारू.....


'म्हातारी चक्क म्हणते 'हो आलेच' म्हाताऱ्याला विश्वासच वाटत नाही,

आनंदाने त्याचा चेहरा उजळून निघतो.

त्याच्या डोळ्यात अश्रु दाटून येतात. त्याच्या एका डोळ्यातून एक अश्रू खाली येतो तो गालावर येतो आणि अचानक थिजून जातो. डोळ्यातलं तेज कमी-कमी होत जातं...

आणि ते निस्तेज होतात... म्हातारी आपलं आटपून म्हाताऱ्याशेजारी झोपाळ्यावर येवून बसते आणि म्हणते बोला काय बोलायचय..

पण म्हातारा काहीच बोलत नाही.
ती म्हाताऱ्याला हात लावते..

शरीर थंडगार पडलेले असते आणि डोळे एकटक म्हातारीला बघत असतात.....

क्षणभर म्हातारी हादरते. सुन्न होते. तिला काय करावं हेच सुचत नाही. पण एक-दोन मिनिटात ती लगेच सावारते...

हळूच उठते, पुन्हा देवघरापाशी जाते, एक उदबत्ती लावते, देवाला नमस्कार करते;

आणि पुन्हा झोपाळयावर येवून बसते.

म्हाताऱ्याचा थंडगार हात घेते आणि म्हणते 'चला कुठे जायचय फिरायला' आणि काय गप्पा मारायच्यात तुम्हाला ? बोला...'

असं म्हणत म्हातारीचे डोळे पाणवतात.....

एकटक नजरेन ती म्हाताऱ्याकडे बघत असते आणि हळूच तिच्या डोळ्यातले अश्रू गोठून जातात आणि म्हातारीची मान अलगद म्हाताऱ्याच्या खांद्यावर पड़ते.

झोपाळ्याचा मंद झोका सुरूच असतो....

नुसते शुन्य जमा करत बसू नका मुलांसाठी. नाहीतर तुमचे स्वतःचे आय़ुष्य शुन्य होईल.

हे ज्याने लिहीले आहे खरंच खुप छान त्याला माझा नमस्कार....

सर्व पालकांना समर्पित....
प्रेम कहाणी,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या