लेकीचा साखरपुडा कवी प्रा. विजय पोहनेरकर


*ये माय बैस थोडं माझ्या जवळ !*/
*लेकीचा साखरपुडा !*
*कवी : प्रा. विजय पोहनेरकर*
---------------------------------------------------
ये माय बैस थोडं माझ्या जवळ
कळालच नाही माझी लाडाची लेक
एवढी मोठी कधी झाली ते !
सहज कुणीतरी स्थळ सुचवलं
म्हणून विचारून पाहिलं
आणि बघता बघता पुढच्या सगळ्याच गोष्टी
इतक्या फास्ट आणि सुरळीत झाल्या
की आज एकदम
*साखरपुड्याचाच दिवस उगवला !*
माझ्या चिमणीचे दोनाचे चार हात होत आहेत
तिच्या अंगाला हळद लागणार आहे
याचा आनंद नक्कीच आहे
पण एक अनामिक हुरहूर वाटत आहे !
आज साखरपुडा होईल
येत्या तीन चार महिन्यात लग्न होऊन
लेक सासरी निघूनही जाईल !
लग्न होऊन प्रत्येक मुलगीच सासरी नांदायला जाते ही जगरहाटीच आहे
तरीही
तू या घरात नसणार या कल्पनेनंच कसं तरी होतंय
हुरहूर , धडधड , काळजाचा तुकडा पडणे
या सगळ्या शब्दांचे खरे अर्थ मला आज कळतायत !
आता माझीच ही परिस्थिती आहे तर तुझ्या आईचे हाल काय असतील ?
या विषयावर एकमेकाला बोलायची आमची हिंमतच नाही !
समोरा समोर आलं की
मी ही अबोल असतो आणि हल्ली ती ही अबोल असते
पसंती आल्या पासून तुझ्याशी खूप खूप बोला वाटतं
पण शब्दच फुटत नाहीत
म्हणून म्हणलं .........
*ये माय बैस थोडं माझ्या जवळ !*
बघू दे तुझ्याकडे मायेनं
येऊ दे दाटून असंख्य आठवणी
आठउ दे भातुकलीचा खेळ ,
काही गोष्टींसाठी केलेला हट्ट
मी बाहेरून आल्यावर तू मारलेली गच्च मिठी
बाहेर जातांना भरून आलेले तुझे डोळे
आणि आत्ता येतो हे वचन देतांना
तुझा घेतलेला *गोड गोड पापा !*
आणि क्षणार्धात तुझ्या चेहऱ्यावर पसरलेला लाख मोलाचा आनंद !
म्हणून म्हणतो .......
फिरउ दे तुझ्या डोक्यावरून मला हात
लहानपणी सारखा ,
तुला लाख लाख शुभाशीर्वाद देण्यासाठी !
कारण .........
उद्या पासून तुझ्यावर दुसरं कोणीतरी हक्क सांगणार आहे !
*अजून दोन दिवस राहू द्या मुलीला*
ही याचना मला करावी लागणार आहे !
*ते* घर तुझं आणि *हे* घर परकं होणार आहे !
*खरंच तसं होत असतं ?*
होत नाही ......पण मानावं लागतं !
बघ न काय वेडे पणा आहे
तुला समजावायचं सोडून
मीचं हळवा होतोय ,
पोरीचा बाप पोरगी जातांना
*पालापाचोळा* होतोय !
*पोटचा गोळा देतांना चोळामोळा होतोय !*
बाळ मला खात्री आहे
तू सगळं छान निभाऊन नेशील !
तुझ्या वागण्याने , बोलण्याने , नम्रतेने
सगळ्यांना आपलंसं करून घेशील !
तुझ्या शिवाय *त्या घरात* पानही हलणार नाही
*पण या घराचं आणि आम्हा दोघांचं काय होणार ?* हा प्रश्न कुणीही कुणाला विचारायचा नाही !
कारण ...........
काही काही प्रश्नांची उत्तरं न मिळवण्यातच भलं असतं , तसाच हा एक प्रश्न !
हे झालं आमचं
आणि तुझं ?
बाप रे ! कल्पनाही करवत नाही !
तुझ्या मनाची घालमेल
मी समजू शकतो
प्रत्येक आसवां मागचे भाव
मी जाणू शकतो
पण ..........
पण काही काळजी करू नकोस
सगळं सगळं छान होईल !
लवकरच तुझ्या चेहऱ्यावर
खळखळणार हासू नक्की येईल !
पण का कोण जाणे
पसंती आल्या पासून
तुझ्याकडे पुन्हा पुन्हा पहा वाटतं
आणि मायेनं जवळ घ्यावं वाटतं
म्हणून म्हणलं .....
*ये माय बैस थोडं माझ्या जवळ !*
*प्रा. विजय पोहनेरकर*
*9420929389*
*औरंगाबाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या